श्री रंगनाथ स्वामी यांच्या विषयी
श्री रंगनाथ स्वामी हे समर्थ विरचित दास पंचायतनापैकी एक समर्थसंत आहेत. १) श्री रामदास स्वामी (सज्जनगड ) २) श्री जयरामस्वामी (वडगाव) ३) श्री रंगनाथ स्वामी (निगडी ) ४) आनंदमूर्ती (ब्रह्यनाळ ) ५) श्री केशवस्वामी (भागानगर , हैद्राबाद ) असे समर्थ व शिवकालीन दास पंचायतन आहे.श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म रविवार मिती मार्गशीर्ष शु // १० // शके १५३४ नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे झाला. श्री. बोपाजीपंत देशपांडे व सौ. बयाबाई यांना तीन अपत्ये झाली. त्यापैकी क्रमांक दोनचे चिरंजीव श्री रंगनाथ स्वामी होते.श्री रंगनाथ स्वामी यांचे कनिष्ठ बंधू विठ्ठलस्वामी हे निगडी येथे आले. त्यांचे गोसावी मंडळी हे वंशज आहेत.लहानपणी वयाच्या बाराव्या वर्षी मुंज झाल्याबरोबर रंगनाथ स्वामींनी हिमालयात प्रयाण केले. तेथे त्यांनी बद्रीधाम सध्याची मानाबाॅर्डर येथे व्यास गुंफेमध्ये राहून ध्यानधारणा व अध्यात्मज्ञान मिळविले. सतत अठरा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना व्याघ्ररुपामध्ये श्री गुरुदत्तात्रय यांनी दर्शन दिले, व समाजसेवा करण्याची आज्ञा दिली व राजयोगाचा वर दिला.महाराज दक्षिण भारताकडे प्रवासास निघाले असताना हिमाचल प्रदेशातील टिहरी संस्थानिकांनी त्यांना राजयोगाचा भाग म्हणून भरजरी वस्त्रे, महावस्त्रे, आभूषणे, भाला, तलवार व मनोहर नावाचा तेजस्वी अश्व प्रदान केला. त्यावेळेपासून महाराज घोडयावरून प्रवास करीत असत. मनोहर घोडा ज्यावेळी महाराजांची आज्ञा मानणार नाही तो परिसर आपले कार्यक्षेत्र करावे असा दृष्टांत महाराजांना झाला होता . येणेप्रमाणे हा अश्व निर्गुणपूर म्हणजे निगडी येथे आल्यावर तेथे मनोहर अश्वाने त्यांची आज्ञा मानली नाही . त्याचा खुर एका विशाल शिळेमध्ये रुतला. ही आज्ञा समजून महाराजांनी निगडी ही कर्मभूमी निवडली. ही विशाल शिळा आजही पहावयास मिळते. त्याचे स्मारक येथे केलेले आहे.निगडी येथे वास्तव्य करून महाराजांनी त्यावेळचे दास पंचायतनामध्ये प्रवेश केला व शिवाजी महाराजांचे धर्मकार्यास वाहून घेतले. श्री. शिवाजी महाराजांनंतर श्री संभाजी महाराजांचे धर्मकार्यामध्ये ते सक्रीय झाले. असे छावा कादंबरीकार श्री. शिवाजी सावंत व संभाजी कादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांनी आदराने नमूद केले आहे.
श्री महाराज यांची उंची ६ फूट होती. ते आजानबाहू होते. त्यांचा पेहराव सरदारासारखा होता. दांडपट्टा चालविणे, तलवारबाजी, भालाफेकी यामध्ये ते निष्णात होते. ते आनंदसांप्रदायी होते. या वर्णनाचे तैलचित्र औंध संस्थानाचे श्री. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी काढलेले आहे. ते आजही आपणास पहावयास मिळते.
महाराज हे ब्रह्मचारी होते व संन्यस्त वृत्तीने रहात असत. त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. महाराजांनी केलेल्या साहित्यावर त्यांची पी. एच. डी. सुद्धा होवू शकेल. श्री रंगनाथी योग वसिष्ठ, गुरूगीता, रामजन्म, गजेंद्रमोक्ष, निजानंद साधने, सुदाम चरित्र, शुकरंभा संवाद, पंचीकरण, मिथ्या माया स्वरूप, श्री एकाखडी ओव्या, अष्टके इत्यादी साहित्य धुळे येथील श्री राजवाडे वि. का. यांच्या वाङदेवता ग्रंथालयात आजही उपलब्ध आहे. तसेच ते आता ट्रस्ट ऑफिस निगडी येथे उपलब्ध आहे. स्वामींची गुरुभक्ती, देवभक्ती, देशप्रेम, अध्यात्मिक प्रवृती ही इतकी प्रबळ होती की त्याची स्तुती करने ही आनंद संप्रदायी माणसाचे विचारापलीकडील गोष्ट आहे. महाराजांचे गुरु त्यांचे वडील श्री निजानंद महाराज हे होते.श्री रंगनाथ स्वामीनी निगडी येथे मठ तयार केला. त्यासाठी तत्कालीन निगडी ग्रामवासियांनी खूप सहकार्य केले. विशेषकरून डांगरे लोकांचा नामोल्लेख ऐकिवात आहे. महाराजांनी आपले अवतार कार्य रविवार मिती मार्गशीर्ष व // १० // शके १६०६ रोजी निगडी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथे पूर्ण केले व त्याचवेळी हे सगुणब्रम्ह अनंतात विलीन झाले. त्यांची समाधी निगडी येथे आहे. त्यावर श्री संभाजी महाराजांनी भव्य मंदिर बांधले आहे. आजही अनेक भक्त त्यांचे दर्शनासाठी मंदिरामध्ये येतात.
श्री रंगनाथ स्वामी हे उत्तम कीर्तनकार असल्यामुळे त्या माध्यमातून ते धर्मकार्य, लोकजागृती करून देशसेवा, समाजसेवा करीत होते. त्यांचे उत्तरदायित्व म्हणून आजही निगडीकर मंडळी अनेक ठिकाणी कीर्तन, प्रवचन, भजन करून समाज प्रबोधनाचे कार्य करतात. परिस्थितीतील बदलामुळे ‘श्री रंगनाथ स्वामी मठ निगडी ‘ या नांवे दिनांक ३१/८/१९५५ रोजी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट केला आहे. त्याचा नंबर ए ११४० असून विद्यामान विश्वस्त श्री. डाॅ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ,श्री. प्रसन्न शशिकांत गोसावी , श्री. अमरनाथ अच्चुत गोसावी आणि श्री.मोहन भगवंत गोसावी हे आहेत. हजारो लोकांचे श्रद्धास्थान असणारे निगडी येथील श्री. रंगनाथ स्वामी, त्यांचे मंदिर व परिसर व निगडी गाव हे धार्मिक पर्यटन क्षेत्र होण्यासाठी योग्य त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. त्यास सर्व भक्तांचे सहकार्य अपेक्षित आहे.मंदिरास पूर्वी संभाजी महाराज, पेशवे, पंतप्रतिनिधी औंध यांनी सक्रिय मदत केली आहे. ती काळओघात विलीन झाली आहे. आधुनिक पद्धतीने या मंदिराचा सन १९८३ मध्ये जीर्णोद्धार कमिटी करून जीर्णोद्धार केला. त्यास श्री. नारायण शंकर जगताप, सरपंच निगडी, श्री. शिवाजी ज्ञानदेव वाघ, श्री. विष्णू खाशाबा जगताप, श्री. अंकुश जगताप आदींनी सहकार्य केले.
आजही ट्रस्टद्वारा जीर्णोद्धार, नवीन बांधकाम, भक्तनिवास, भोजन व्यवस्था, कार्यक्रमासाठी हॉल, कीर्तन महोत्सव, गरजूना शिष्यवृत्ती हे कार्यक्रम चालू आहेत. तसेच धर्मादाय हॉस्पिटल काढण्याची संकल्पना आहे. त्याचे प्रत्यंतर म्हणून अनेक तऱ्हेचे मेडिकल कॅम्प, रोगनिदान शिबीरे, रक्तदान शिबीरे, हृदयरोग निदान, मधुमेह निदान अशी अनेक शिबिरे एकसळ, निगडी, आझादपूर येथे ट्रस्टचे वतीने घेण्यात आलेली आहेत. तसेच आता नव्याने अन्नपुर्णा हाॅल व वेदशत्र पाठशाला यांचे बांधकाम करण्यात येत असून वेदशत्र पाठशाला उभारण्यात येत आहे. सामाजिक गरजा लक्षात घेवून ट्रस्ट कार्यरत राहणार आहे. यासाठी भक्तांनी द्रव्यदान, अन्नदान, रक्तदान,श्रमदान यासारखी दाने देवून ट्रस्टला साहाय्य करावे.महाराजांचा वार्षिक पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष वद्य ७ ते वद्य १३ पर्यंत साजरा होत असतो. यापैकी मुख्य दिवस मार्गशीर्ष वद्य १० असतो. यावेळी श्रींची पालखीतून सवाद्य संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते. समाजातील सर्व थरातील लोक यात सहभागी होतात. मंदिरामध्ये समाधीस महारुद्र केला जातो व कीर्तने, प्रवचने, भजने, गायन, भारुड इत्यादी कार्यक्रम करून समाजप्रबोधन केले जाते. मठामध्ये श्री. नारायण शंकर जगताप यांचे पुढाकाराने ज्ञानेश्वरी पारायण गेली ३९ वर्ष केले जाते. तसेच प्रत्येक महिन्याचे वद्य १० ला मासिक पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. श्रींच्या पादुकांची पालखी पायी दिंडी ही कार्तिक एकादशी रोजी निगडी ते पंढरपूर जाते. या सर्व कार्यक्रमामध्ये अनेक भक्तजण व निगडी ग्रामस्थ बहुसंखेने भाग घेतात.
महाराजांचे कार्यावर व दशर्नावर जे हजारो भक्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचे कल्याण होते, मनःशांती मिळते असे भक्त मानतात. अशा या संतश्रेष्ठ श्री राजयोगी निजानंद रंगनाथ स्वामी महाराज निगडीकर यांच्या समाधीस सर्वानी भेट द्यावी.