संस्था विषय
समाज प्रबोधनासाठी आपले जीवन समर्पित केलेले व आपल्या तपश्चर्येतून सामाजिक परिवर्तन घडवणारे , तसेच ज्यांना तुझ्या घोड्याचा खूर ज्या ठिकाणी पाषाणात उमटेल ती कर्मभूमी समजून तेथे वास्तव्य करावे , असा श्री दत गुरूंनी स्वतः आदेश दिलेले निगडी , ता . कोरेगाव , जि .सातारा येथील समर्थ पंचायतनापैकी एक श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म नाझरे, जिल्हा सोलापूर येथील प्रसिद्ध देशपांडे घराण्यात झाला . अत्यंत प्रासादिक साहित्य रचना हे श्रीरंगनाथ स्वामी यांची वैशिष्ठ्य! योगवसिष्ठसार ,परमार्थ बोध, गुरुगीता व इतर अनेक ग्रंथांची तसेच काव्य व अभंगाची रचना स्वामींनी केली आहे . आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार त्यानी निगडी येथे वास्तव्य केले . समाधी मंदिर परिसरात घोड्याचा खूर आजही त्याची साक्ष देतो . श्री सद्गुरू निजानंद श्रीरंगनाथ स्वामी यांचा प्रतिवर्षी पुण्यतिथी उत्सव निगडी येथे दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा केला जातो . या काळात ज्ञानेश्वरी पारायण ,महारुद्र ,महानैवेद्य ,भजन ,पूजन ,कीर्तन , गायन व येणाऱ्या सर्व भक्तजनांची निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था श्रीरंगनाथ देवस्थान ट्रस्ट मार्फत व सर्वांच्या सहकार्याने केले जाते.